नाशिक-शहरात इनोव्हेशन कल्चर तयार होऊ पाहते आहे. तरुणांकडे असलेल्या नावीन्यपूर्ण कल्पनांतून नवनिर्मिती घडू लागली आहे. शासन, सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील, त्यांना परवडतील असे संशोधन व नवनिर्मितीवर भर दिल्यास शहर स्मार्टसिटी व्हायला वेळ लागणार नाही, असे मत विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी आज येथे व्यक्त केले.
कुंभथॉन फाउंडेशनतर्फे अंबड येथील नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये होत असलेल्या "कुंभथॉन फाइव्ह‘मध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी आमदार प्रा. देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, एमआयटी (बॉस्टन) मीडिया लॅबचे प्रमुख डॉ. रमेश रास्कर, कुंभथॉन फाउंडेशनचे सीईओ संदीप शिंदे, प्रा. सचिन पाचोरकर, महेश गुजराथी आदी उपस्थित होते.
श्री. डवले म्हणाले, की यापूर्वी शहराच्या विकास साधण्यासाठी आलेल्या संधी सुटल्या; परंतु यापुढे येणाऱ्या संधी वाया घालवायला नको.
जिल्हाधिकारी कुशवाह म्हणाले, की शहराला स्मार्टसिटी बनविण्याच्या संकल्पनांचे प्रशासनातर्फे नेहमी स्वागत राहील. अशा गोष्टींसाठी वेळ उपलब्ध करून दिला जाईल.
महापालिका आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले, की केवळ कुंभमेळ्यापुरताच नव्हे, तर यानंतरही संशोधकांना हवी ती मदत उपलब्ध करून दिली जाईल. संशोधनाची, नवनिर्मितीची ही चळवळ जागृत राहिली पाहिजे.
दरम्यान, दुपारच्या सत्रात आमदार सीमा हिरे यांनी कुंभथॉनला भेट देऊन प्रकल्पांची माहिती जाणून घेतली. आज दिवसभरात डेटा मॅटिक्सचे संस्थापक सदस्य डॉ. कनोडिया, रमेश रासकर, "आयबीएम‘चे राधेश आदींनी मार्गदर्शन केले.
इनोव्हेशन हब बनविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य - प्रा. फरांदे
शहराच्या विकासात तंत्रज्ञानाचा खूप महत्त्वाचा वाटा राहणार आहे. शहरात संशोधनाची चळवळ उभी करण्यासाठी इनोव्हेशन सेंटर होणे आवश्यक आहे. या सेंटरसाठी व शहराला इनोव्हेशन हब बनविण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी दिली. या संदर्भात शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कापडी पिशव्या उपलब्ध करून देणार "दर्जी‘
कुंभथॉनअंतर्गत "दर्जी‘ हा उपक्रम राबविला जात आहे. यात शहर परिसरातून साड्या, कपडे व अन्य कापड गोळा केले जात आहे. खेड्यापाड्यांतील गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देत त्यांच्याकडून या कापडाच्या पिशव्या तयार करण्याचे काम सुरू आहे. या कापडी पिशव्यांचे वाटप कुंभमेळ्यादरम्यान केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी श्वेता गुजराथी, यश जगताप, ऋषभ लांभिया आदी काम पाहत आहेत.