Update:  Friday, August 14, 2015 5:54:43 PM IST


| |

टेक्‍नोसॅव्ही कुंभमेळ्यासाठी 'कुंभथॉन'मध्ये मंथन
- -
बुधवार, 28 जानेवारी 2015 - 02:30 AM IST

नाशिक - कुंभ फाउंडेशनतर्फे सिम्बॉयोसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंट येथे होत असलेल्या "कुंभथॉन 4‘चे उद्‌घाटन काल (ता. 26) झाले. उद्‌घाटनानंतर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेटी घेत प्रकल्पांची माहिती जाणून घेतली. आगामी कुंभमेळा टेक्‍नोसॅव्ही बनविण्यासाठी "कुंभथॉन‘मध्ये विचारमंथन सुरू झाले आहे.

कार्यक्रमास उपमहापौर गुरुमित बग्गा, नगरसेवक लक्ष्मण मंडाले, बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा, अविनाश शिरोडे, अमेय तातेड उपस्थित होते. कुंभमेळा सुखकर करणाऱ्या या उपक्रमाला महापालिकेतर्फे संपूर्ण सहकार्य दिले जाईल, असे आश्‍वासन उपमहापौर बग्गा यांनी दिले. "सपट‘चे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल जोशी, झेरॉक्‍स कंपनीचे दासगुप्ता, "टीसीएस‘चे श्री. श्रीक्रिनन, "एमआयटी‘चे रमेश रासकर, कॅटलिन डोलकार्ट, संदीप शिंदे, सुनील खांडबहाले, जॉन वॉर्नर यांनी या वेळी चर्चासत्रात सहभाग नोंदविला.

जिल्हाधिकारी विलास पाटील, महापालिका आयुक्‍त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह "
मायक्रोसॉफ्ट रिसर्च‘चे आनंदन, "गुगल इंडिया‘चे सुनील राव, "इंटेल‘चे सचिन केळकर आदींनी भेटी दिल्या.
आज विभागीय आयुक्‍त एकनाथ डवले, मेळा अधिकारी रघुनाथ गावडे यांनी भेट देत प्रकल्पांविषयी माहिती घेतली.

‘कुंभ-स्टे‘द्वारे स्वस्तात निवारा
कुणाला आपल्या घरातील रिकामी खोली भाडेतत्त्वावर देऊन उत्पन्न कमविण्याची इच्छा असेल, अशांसाठी दिल्लीतील "व्हीआयटी‘चा विद्यार्थी प्रांजल जैन याने ऍक्‍शन प्लॅन आखला आहे. बी.टेकच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या या विद्यार्थ्याने ऑनलाइन मॉडेल तयार करून याद्वारे खोलीची सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. सुरक्षिततेसाठी मालकाकडून वीजबिलाचा पुरावा, ग्राहकाकडून शासनाचे ओळखपत्र पडताळणी करण्याचे या प्रोजेक्‍टमध्ये नियोजित आहे. तसेच, जर एखाद्याची फसवणूक झाल्यास त्याला विम्याद्वारे भरपाई मिळवून देण्याचा विकल्पही विद्यार्थ्याने उपलब्ध ठेवला आहे.

आरोग्य विद्यापीठाकडून एक लाखाची बक्षिसे
संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी "कुंभथॉन‘मध्ये आरोग्यविषयक प्रकल्प सादर करणाऱ्यांसाठी 25 हजार रुपयांची अशी चार बक्षिसे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे दिली जाणार आहेत. कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी "कुंभथॉन‘ला भेट देत मार्गदर्शन केले. शहराच्या प्रवेशद्वारांवर आयएफ, बारकोड तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याविषयी डेटा डिजिटल केल्यास फायदेशीर ठरेल. वैद्यकीय सुविधेसाठी ड्रोनचा वापर उपयुक्‍त ठरेल. आपत्ती व्यवस्थापन, गर्दी व्यवस्थापन यांच्याशी संबंधित तीन स्तरांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात प्रतिनिधी, डॉक्‍टर व सर्वसामान्यांचा समावेश असेल, असेही कुलगुरू डॉ. जामकर म्हणाले.

अमेरिकेच्या 18 वर्षीय बॅथेनीचाही सहभाग
संशोधनाची आवड असल्याने अमेरिकेतील 18 वर्षीय युवती बॅथेनी जेआनाने भारत गाठत "कुंभथॉन‘मध्ये सहभाग नोंदविला आहे. बॅथेनीची आई एमआयटी ग्रुपमध्ये कार्यरत आहे. इयत्ता बारावीत शिकत असलेल्या बॅथेनीला संशोधनाची आवड असल्याने तीसुद्धा आईबरोबर "कुंभथॉन‘मध्ये सहभागी झाली. या दरम्यान विविध टीमला मदत करणे, त्यांच्या संकल्पना समजून घेणे असा तिचा दिनक्रम झाला आहे. नाशिकमध्ये फिरून जास्तीत जास्त ठिकाणांना भेट देण्याची इच्छा तिने व्यक्‍त केली आहे. तसेच, "कुंभथॉन‘सारखे उपक्रम संशोधनवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्‍त असल्याचे तिचे मत आहे. 

 
0
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक
आजचा सकाळ...
© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: